गोवा

कोंकणी भाषा मंडळाने नाकारला दत्ता नायक यांचा राजीनामा

मडगाव  :
कोंकणी भाषा मंडळाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दत्ता दामोदर नाईक यांनी दिलेला राजीनामा न स्वीकारण्याचा निर्णय मंडळाच्या कार्यकारिणीने एकमताने घेतला आहे. गुरुवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मंडळाचे अध्यक्ष सेराफीन कोता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. कोंकणी चळवळ उभी करण्यासाठी दत्ता नाईक यांनी केलेल्या मोलाच्या योगदानाचा गौरव आणि आदर म्हणून त्यांचा राजीनामा स्वीकारू नये, असा निर्णय कार्यकारिणीने घेतल्याचे त्यांनी सांगितले. कोंकणी चळवळीतील त्यांचे योगदान हे सामूहिक प्रवासाचा अविभाज्य भाग असून, पुढील वाटचालीतही त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

विविध मुद्यांवर मतभेद असणे स्वाभाविक असले, तरी त्याचे रूपांतर मनभेदात होऊ नये, असे स्पष्ट मत सेराफीन कोता यांनी व्यक्त केले. मतभेदांवर खुलेपणाने चर्चा करून त्यातून एकमताचा मार्ग शोधणे, हाच कोंकणी चळवळीतील लोकशाहीचा गाभा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ मतभेदांमुळे कोंकणी चळवळीसाठी आयुष्यभर कार्य केलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला दूर करणे मंडळाला मान्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

​दत्ता नाईक यांनी मंडळाला दिलेली देणगी परत घेण्याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून, मंडळ त्याचा पूर्ण आदर करते. या निर्णयावर भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचेही कोता यांनी स्पष्ट केले.

कोंकणी भाषा चळवळीच्या पुढील वाटचालीवर मंडळाचा भर असून, दत्ता नाईक यांचे सहकार्य यापुढेही लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!