अजान, हनुमान चालीसा, लाऊडस्पिकर आणि आपण सारे…
– अस्लम जमादार
‘अजान’ विषयी अतिशय संतुलित संवैधानिक भूमिका घेणे गरजेचे आहे. पण या विषयी दोन्ही समाजातील धर्मांध शक्तींनी टोकाच्या भूमिका अंगिकारत असल्याने हा प्रश्न सुटण्या ऐवजी चिघळत असल्याचे दिसून येवू लागले आहे.
आज ग्रामीण शहरी, नागरीवस्त्या मधून दिवसातील ठराविक वेळेत ‘अरबी’ शब्दातील ‘अजान’ कानी ऐकू आली की समजावे येथे जवळपास मशिद (मुस्लिमांचे प्रार्थना स्थळ) आहे आणि नमाजची वेळ झाली आहे. परंतु दुर्दैवाने ‘अजान’ हा खरेतर अरबी शब्द त्याचा अर्थ ‘ऐका’. ह्या गोड मधूर काव्य वाणीने भक्तांना तुम्ही जेथे असाल, जे काम करत असाल थोडासा वेळ बाजूला काढून ह्या देवागृहात एकत्र या. मन शांत व चिंत्त ठेवून ध्यानस्थ रहीत प्रार्थना (नमाज) अदा करा. आणि पूर्ववत आपल्या कामास सुरूवात करा.
अजानची सुरूवात अल्ला हू अकबर म्हणजे सृष्टीचा निर्माता केवळ अल्लाह (परमेश्वर) आहे. तो महान आहे सूर्योदयाच्या क्षणी झोपेमध्ये तल्लीन न होता प्रार्थना (फजर-नमाज) कडे धावा घ्या अजान मधून संबोधले जाते. दिवसातून सूर्योदय (फजर) दूपारी 1.30 व 4.30 सूर्यास्त वेळ व रात्रौ 8.30-9 (इंशा) अशा पाच वेळा नमाज तेथील सूर्य-चंद्र दर्शन नुसार पार पाडल्या जातात.
प्रेषित मुहम्मद पैगंबर ह्यांच्या काळात देखील ‘अजान’ होत असत. लाऊड स्पिकरचा शोध इ.स. 1861 साली जॉन फिलीप ह्यांनी लावला पुढे इ.स. 1876 साली अलेक्झांडर ग्राहम बेल ह्यांनी पहिले पेटंट कार्यन्वित केल्याचे दिसून येते. ह्याचा स्थळ अर्थ होतो की इ.स. 1861 पर्यंत ‘अजान’ लाऊड स्पिकरवर होवूच शकत नव्हत्या. पुढे धर्मांध गुरूंनी ‘अजान’ ही कृत्रिम/लाऊड स्पिकरवर घेण्यास मज्जाव तर केलाच परंतु 50 वर्षांपूर्वी इ.स. 1900 पर्यंत लाऊडस्पिकर वरील ‘अजाण’ ही हराम (अर्थात गैर) समजली जात असे. त्यामुळे आताच्या मुस्लिम पीठीनी हा अट्टाहास धरताच कामा नये.
‘अजाण’ ही एक भक्ती शक्तीआहे. अमिताभचा ‘कुली’ असो अथवा ‘शोले’ चित्रपटातील ती अजाणचा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिल्यास आज ही अंगावर शहारे निर्माण करतात. परंतु दुर्दैवाने मुस्लिम समाजाने काळानुरूप बदल घडवत ही ‘अजाण’ प्रादेशिक भाषात म्हणजे महाराष्ट्रात-मरठी, कर्नाटकात कन्नड अशा भाषेत अनुवादीत करून पाऊल टाकले असते तर आजची ही समस्या कदाचित उद्भवली नसती. अजून ही वेळ गेली नाही. बौद्धिक, परिवर्तन मुस्लिमांनी हा प्रसंग आता करून पाहण्यास हरकत नाही असे मला वाटते.
‘लाऊड स्पिकर्स’चा अट्टाहास इतर धर्मीयासाठी की स्वत:च्या समाजासाठी हे ही पहाणे महत्त्वाचे ठरते. प्रत्येक मुस्लिमांना नमाजची वेळ ही माहित असणे व त्यासाठी मशिदीत सामील होणे अनिवार्य आहे. त्यासाठी ‘अजान’ लाऊड स्पिकर वरून ऐकू आल्यासच मी मशिदीकडे धावा घेईन हे चुकीचे ठरते भल्या पहाटे सकाळी ‘अजान’ वरून इस्पितळे, नागरीवस्ती मधील रुग्ण व वृद्धांना त्रास होत असेल तर ती ती बाजू समजून घेतली पाहीजे. तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रिय पर्यावरण, मंत्रालयाच्या सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड (सी पी सी बी) तर्फे पुढील प्रमाणे निश्चित केलेला आहे तो पाळणे अनिवार्य आहे.
दिवसा रात्री
औद्योगिक परिसर – 75 70 डेसीबल्स
व्यवसायिक परिसर – 65 55
नागरी वस्ती – 55 45
सायलेन्स झोन – 50 40
मी ज्या पुण्यातील हडपसर परिसरात जन्मलो आणि मोठा झालो त्या परिसरातील गांधी चौकात अलमगीर मशिद व ‘हनुमान मंदिर’ एकाच ठिकाणी वसले. असून 100 वर्षांहून अधिकाळ येथे ‘अजान’ किंवा ‘हनुमान चालिसा’ हा विषयही कधी मनात आला नाही. नमाजच्या ‘अजान’च्या वेळेत हिंदू समाज सन्मान तर काकड आरती किंवा हनुमान जयंती. शनिवारी मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने सामिल होत असतात. हडपसर प्रमाणेच राज्यातील अनेक ग्रामीण शहरी भागात अशा ऐक्याचे दर्शन पहावयास मिळते आणि अभिमान वाटतो परंतु दोन्ही समाजातील मूठभर धर्मांध शक्तीमुळे सध्याचे वातावरण कलुषित होवू लागले आहे. ह्या धर्मांध शक्तीचा बीमोड करण्यासाठी दोन्ही समाजातील बौद्धीक व परिवर्तनवाद्या समोर मोठे आव्हान उभे आहे. त्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे अन्यथा पोलिसांनी अटक केल्यावर जामिनीसाठी/कोर्टात वकिलाचा खर्च कोण करणार/अटक झाल्यावर रोजगार व त्या कुटूंबासाठी काय करणार ह्या प्रश्नाची उत्तरे आम्हाला कोेठेही देवू शकतील काय तरच हे अजान/हनुमान चालिसा आंदोलनात सहभागी होण्याचे सार्थक संबंधितांना मिळू शकेल काय? हा खरा प्रश्न आहे.