
उबरची ‘अॅम्ब्युलन्स असिस्टन्स’ सेवा
नवी दिल्ली: राईड-हेलिंग सेवा देणाऱ्या उबरने प्रवासी आणि चालकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी ‘रेकॉर्ड माय राईड’ आणि ‘अॅम्ब्युलन्स असिस्टन्स’सह चार नव्या सुरक्षा सुविधांची घोषणा केली आहे. उद्योगात प्रथमच सादर करण्यात आलेल्या या सुविधांमुळे आपत्कालीन परिस्थितीत अधिक वेगाने मदत मिळण्याबरोबरच प्रवास अधिक सुरक्षित करण्यावर भर देण्यात आला आहे.
‘रेकॉर्ड माय राईड’ या सुविधेमुळे चालकांना प्रवासादरम्यान उबर अॅपमधून स्वतःच्या मोबाईलवर वाहनातील व्हिडिओ एन्क्रिप्टेड स्वरूपात रेकॉर्ड करता येणार आहे. हा व्हिडिओ चालक किंवा उबरकडून पाहता येणार नाही. सुरक्षा तक्रारीचा भाग म्हणून चालकाने तो सादर केल्यानंतरच त्याचा वापर केला जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
याशिवाय, वैद्यकीय लॉजिस्टिक्स सेवा प्रदाता ‘डायल ४२४२’च्या भागीदारीत ‘अॅम्ब्युलन्स असिस्टन्स’ सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान अपघात झाल्यास चालक किंवा प्रवासी उबरच्या २४x७ सेफ्टी लाईनद्वारे तातडीने अॅम्ब्युलन्सची मागणी करू शकतील.
उबरने आणखी दोन सुरक्षा सुविधा जाहीर केल्या आहेत. ‘डोन्ट टाईप अँड ड्राइव्ह’ या सुविधेमुळे वाहन चालू असताना चालकाला अॅपमध्ये टायपिंग करता येणार नाही. संदेशाला उत्तर देण्यासाठी प्रथम सुरक्षित ठिकाणी वाहन थांबविण्याचा सल्ला अॅपद्वारे दिला जाईल. तर ‘सेट युवर ओन PIN’ या सुविधेमुळे प्रवाशांना स्वतःचा ट्रिप व्हेरिफिकेशन पिन तयार करून तो अनिवार्य करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
यापूर्वीही उबरने ऑडिओ रेकॉर्डिंग, महिला प्रवासी प्राधान्य (Women Rider Preference), हेल्मेट सेल्फी पडताळणी (Helmet Selfie Verification) आणि सीटबेल्ट रिमाइंडर्स यांसारख्या सुरक्षा सुविधा सुरू केल्या आहेत. RideCheck, २४x७ Safety Line, Safety Preferences तसेच Phone आणि Address Anonymisation या सुविधा देखील कंपनीकडून उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना वाहतूक नियमांचे पालन, सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर याबाबत जनजागृती करण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. सुरक्षित वाहनचालना आणि आपत्कालीन मदतीसाठी उबरने केलेल्या नवकल्पनांचे त्यांनी कौतुक केले.
उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे सुरक्षा संचालन प्रमुख सूरज नायर म्हणाले की, सुरक्षा क्षेत्रातील नवकल्पना ही केवळ वेगळेपणाची बाब न राहता संपूर्ण उद्योगासाठी किमान मानक बनली पाहिजे. बदलत्या अपेक्षांनुसार संपूर्ण उद्योगाने अधिक उच्च सुरक्षा मानके स्वीकारावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
उबरने २०१३ मध्ये भारतात सेवा सुरू केली असून सध्या कंपनी १२५ हून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहे. बाईक, ऑटो, कार, मेट्रो आणि बस अशा विविध प्रवास सेवा एकाच अॅपवर उपलब्ध करून देतानाच २० लाखांहून अधिक चालकांना उत्पन्नाची संधी उपलब्ध करून दिल्याचा दावा कंपनीने केला आहे.




