ED ने सहकार आयुक्त कार्यालयातून जिल्हा बॅंकेची नेमकी काय माहिती मागविली ?
सातारा (महेश पवार) :
सातारा जिल्हा बॅंकेच्या अनुदानित पीक कर्ज घोटाळा आणि इतर कोणत्याही बाबतीत एफआयआर तसेच,बँकेविरुद्ध आजपर्यंत दाखल असलेल्या खटल्यांचा संपूर्ण तपशील ईडी ने मागवल्याने जिल्हा बॅंकेची डोकेदुखी वाढणार? मात्र या बाबतीत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन ( काका) पाटील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हे माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार देत असून, बँकेचे अध्यक्ष हे सचिवांच्या डिस्ट्रिक्ट सुपरव्हिजन संस्थेचे अध्यक्ष असून, बँकेचे सीईओ त्या संस्थेचे सचिव म्हणून काम पाहतात.त्यात जिल्ह्याचे उपनिबंधक व लेखापरीक्षक यांच्यासोबत बँकेचे आणखी काही संचालक सुद्धा डिस्ट्रिक सुपरव्हिजनचे संचालक म्हणून काम पाहतात.
दरम्यान नेमकी ED कोणत्या प्रकारची चौकशी करण्याचे आदेश दिले होते ते पाहूया …
1) अनुदानित पीक कर्ज घोटाळा किंवा इतर कोणत्याही बाबतीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विरोधात केलेल्या तपासाचा संपूर्ण तपशील सादर करावा.
2) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरचा तपशील, जर असेल तर
3) सदर बँकेविरुद्ध दाखल खटल्यांचा तपशील, जर असेल तर
वरील मुद्यांची चौकशी प्रथम प्राधान्याने करण्यात यावी. या प्रकरणी केलेल्या उचित कार्यवाहीबाबतचा मुद्देनिहाय, वस्तुस्थितीदर्शक व अभिप्रायात्मक अहवाल आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह Director of Enforcement, Mumbai Zonal Office-II यांना परस्पर पाठवून त्याची प्रत या कार्यालयास सादर करावी अशी ईडीची स्पष्ट मागणी सहकार आयुक्त कार्यालयामार्फत सातारा जिल्ह्याचे उपनिबंधक मनोहर माळी यांना करण्यात आली आहे.
जिल्हा बॅकेशी संलग्न असलेल्या विकास सेवा सोसायटी दुबार पीक कर्ज घोटाळ्याच्या तक्रारी व बोगस कर्ज प्रकरणामुळे, सचिवांच्या मनमानी कारभाराबद्दल जिल्हा सहकार प्रशासन, डिस्ट्रिक्ट सुपरव्हिजनचा संशयास्पद कारभारासोबत जिल्ह्यातील कण्हेरखेड ,निसराळे ,अंबेघर भोगवली व अन्य तक्रारी मुळे जिल्हा बॅंकेची भविष्यात डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता आहे .
कठापूर येथील रहिवासी व कण्हेरखेड येथील तत्कालीन सचिव बजरंग केंजळे यांच्या नियोजित दुबार पीक कर्ज घोटाळा प्रकरणी तक्रार करणारे सामाजिक आणी माहिती अधिकार कार्यकर्ते किशोर शिंदे यांनी ईडी कडे केलेल्या तक्रारी नंतर जिल्ह्यातील अंबेघर भोगवली विकास सेवा सोसायटी बोगस कर्ज प्रकरण बाहेर आलं आहे. किशोर शिंदे यांच्या मते जिल्हा बॅंकेने सचिव बजरंग केंजळे यांचा राजीनामा मंजूर करून, डिस्ट्रिक्ट सुपरव्हिजनच्या 200 हून अधिक सचिवांच्या व त्यांनी केलेल्या कर्जवाटपाच्या चौकशीसाठी तात्पुरता ब्रेक लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. जिल्ह्यातील सचिवांच्या मुजोरीला व भ्रष्ट कारभाराला खत पाणी घालायचे काम, राजकारणी, डिस्ट्रिक्ट सुपरव्हिजन प्रशासन, सहकार प्रशासन करत असल्याचे सर्वांच्याच लक्षात आले आहे.
जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष तसेच केडर प्रमुख नितीन काका पाटील व एकूणच जिल्हा बँक,जिल्हा सहकार प्रशासन यासंदर्भात अनेक तक्रारी व आरोप होऊन सुद्धा खुलासा करत नसल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.