शेती अभ्यास दौरा की युरोप फॅमिली टूर?
सातारा (महेश पवार) :
सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून १५ ऑगस्ट १९४९ साली ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करून त्यांना सहकारी तत्त्वानुसार सहकार्य करण्यासाठी सातारा जिल्हा बँकची स्थापना झाली होती. परंतु अलीकडच्या काळात संचालक, कर्मचारी यांचे परदेशीं अभ्यासदौरे व सेवक भरती, सचिव घोटाळे, ईडी कारवाई यामुळेच सातारा जिल्हा बँक जास्तच गाजू लागली आणि चर्चेत येऊ लागली.
वास्तविक सातारा जिल्हा बँकेचा 90% हुन अधिक बँकिंग व्यवसाय हा जिल्ह्यातील ऊसशेती, कारखानदारी या माध्यमातून येत असताना, अभ्यास दौरे निवडण्यासाठी जिल्ह्यातील, राज्यातील, हवामान, ऋतू, पीक पद्धती, सिंचन, वितरण, साठवण व्यवस्था, फायनान्स, लोकांची जमीनधारणा, जीवनपद्धती याला अनुसरून अभ्यासदौऱ्यांचे लोकेशन निवडणे ही एका व्यवसायकेंद्रित संचालक मंडळ व त्यांच्या सल्लागारांची भूमिका अपेक्षित होती . मात्र शेतकरी हितांच्या योजना राबवताना कॉस्टिंगविषयी जागरूकता दाखवणाऱ्या आपल्या जिल्हा बँकेची प्रशिक्षण व अभ्यास दौर्रे यांच्या कॉस्टिंगकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत चंगळवादी भूमिका दिसून येतेय. एकीकडे संपूर्ण जगाची माहिती इंटरनेट व इतर माध्यमातून सहज उपलब्ध असताना खर्चिक परदेशीं अभ्यास दौऱ्यावर लाखो रुपये खर्च करत जाण्याचा अट्टाहास का? हे सर्व संचालकांनी नैतिकतेच्या आधारावर शेतकऱ्यांना सांगावंच लागेल.
भारतीय शेती युरोपियन शेतीपेक्षा खूप वेगळी आहे. हवामान, मातीचा प्रकार, ऋतूतील फरक, पाण्याची उपलब्धता आणि रहिवाशांच्या खाण्याच्या सवयींवर शेती अवलंबून असते. युरोपमध्ये थंड हवामान आहे आणि त्यामुळे आशियाई देशांच्या तुलनेत भिन्न कृषी उत्पादने आहेत. आपल्या देशात रब्बी आणि खरीप म्हणजे हिवाळा आणि पावसाळा असे दोन कृषी हंगाम आहेत. वर्षातून सुमारे आठ ते दहा महिने पिके घेतली जातात. उन्हाळा हा युरोपमधील शेतीचा हंगाम आहे. अधूनमधून येणारा पाऊस पिकांना पुरेसा असल्याने सिंचनाची गरज नाही. लागवड फक्त 6 ते 7 महिने शक्य आहे. युरोपचा खूप मोठा भाग डोंगराळ आहे आणि शेतीसाठी योग्य नाही. भारतात 55% जमीन शेतीयोग्य आहे. शेतीच्या यांत्रिकीकरणाचा प्रकार भारताच्या तुलनेत तसेच संकरित / उच्च उत्पन्न देणाऱ्या जातींच्या वापरासह प्रगत कृषी पद्धतींमध्ये खूप जास्त आहे.भारतात बहुतेक पारंपारिक पद्धती वापरल्या जातात जेथे युरोपमध्ये आधुनिक पद्धती वापरल्या जातात.
सातारा जिल्हा बँक संचालकांच्या अभ्यास दौऱ्यातील लाभार्थीपैकी कुणी झोक्यावर बसून आनंद लुटला,तर कुणी क्रुझ वर टायटॅनिक पोझ देत अभ्यास पर्यटनाचा आनंद लुटला, एवढेच नव्हे तर वाळवंटात स्कुटर ड्राईव्ह अन् गुळगुळीत रस्त्यावर तीन पैय्याची इलेक्ट्रिक सायकल चालवताना आनंद लुटताना चे फोटो सोशल मीडिया वर टाकायला विसरले नाही, पण शेती अभ्यासासाठी म्हणून गेलेल्या संचालकांचे दुग्ध व फळे, फुले, भाजीपाला अशा शेतावर वा कंपन्यांच्या जाऊन भेटी गाठी घेतल्याचे, तिथल्या शेतकऱ्यांच्या कृषी बाजारपेठा, सप्लाय चैन, साठवण व तंत्रज्ञान संदर्भात एखादा लाईव्ह व्हिडिओ सोडा एक फोटो देखील टाकला नाही .यामुळे सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार वाटू लागलेला आहे.
एवढेच नव्हे तर ह्या जिल्हा बँकेच्या संचालकांच्या दौऱ्यात काही संचालक सहकुटुंब गेल्याचं समोर आले असून, यांचा खर्च नेमका कोणी केला? कि महाबळेश्वर प्रशिक्षण कार्यक्रमाप्रमाणे हा विषय सरकाळेच्या खर्च व्यवस्थापण कौशल्यतून अपार”दर्शी पद्धतीने साधला जाणार हे देव जाणे.
जिल्हा बॅकेच्या या अभ्यास दौर्यावर जिल्ह्यात खमंग चर्चा होत असताना यासंदर्भात उदयनराजे देखील म्हणाले दौरा केला पाहिजे परंतु आज इंटरनेटवर एक क्लिक मध्ये सगळं काही पहायला मिळते असं काय तुम्हाला तिथे जाऊन कळणार आहे,त्यापेक्षा गरिबांना सवलतीची कर्ज उपलब्ध करून दिली असती तर जास्त उपयुक्त ठरले असते अस म्हणत उदयनराजे नी जिल्हा बँकेच्या अभ्यास दौर्यावर गेलेल्या संचालकांना सल्ला देत काय म्हणाले पाहुयात …
आजपर्यंतच्या जिल्हा बँक संचालक मंडळाच्या अभ्यासदौऱ्यातून होणाऱ्या खर्चातून 90% हुन अधिक अप्लभूधारक ऊस उत्पादक शेतकरी, त्यांच्या मालकीच्या संस्था, कारखाने यांना नेमका काय लाभ झाला याचंही ऑडिट होने गरजेचे आहे. संचालक परदेशी शेतीचा प्रयोग व अभ्यास करून शेतकऱ्यांचे नेमकं कोणतं हित साधणार आहेत? संचालक मंडळात कोण बहाद्दर होते ज्यांना सातारा जिल्ह्यातील ऊस शेती व युरोपमधील हवामानात होणाऱ्या शेतीतं साधर्म्य आढळले व ह्या दौऱ्याची मागणी केली, यासाठी किती बजेट मंजूर केलं याची माहिती जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना देणार का ? संचालकांनी परदेशात शेतकऱ्यांचे हितासाठी कोणता अभ्यास केला ? असा सवाल जिल्ह्यातील संतप्त शेतकरी बांधव करत आहेत.