google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

जनतेच्या पैशांवर “फुकट दौरे” थांबवा : युरी आलेमाव  

पणजी :
जवळपास ६०० कोटी खर्च करूनही स्मार्ट सिटीच्या कामांच्या घोळामुळे पणजीतील नागरिकांची संपूर्ण गैरसोय होत असताना, गोवा विधिमंडळ खात्याला मंत्री, आमदार आणि नोकरशहांना एका दिवसात मध्य प्रदेशचा दौरा करून स्मार्ट करायचे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिष्टमंडळाच्या यादीत पणजीच्या आमदाराचा समावेश नाही. जनतेच्या पैशातून होणारे “फुकट दौरे” थांबवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

२२ ते २४  फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ११ आमदारांच्या मध्य प्रदेश दौर्‍याबद्दल गोवा विधिमंडळ खात्याने जारी केलेल्या परिपत्रकावर तीव्र प्रतिक्रिया देताना, विरोधी पक्षनेत्यांनी हा दौरा फालतू खर्च असल्याचे सांगत सरकारवर सडकून टीका केली.

माझ्याकडे विधानसभेतील प्रश्नांना दिलेली उत्तरे आहेत ज्यात समाज कल्याण खात्याचे लाभार्थी, गरीब परिस्थितीतील खेळाडूंना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत असे सांगितले आहे. दुर्दैवाने, सरकारकडे वायफळ खर्चासाठी निधी आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

नगरविकास मंत्री विश्वजित राणे यांनी ‘पणजी स्मार्ट सिटी’च्या विविध प्रकल्पांवर झालेल्या खर्चाची ‘श्वेतपत्रिका’ जारी  करण्याची वेळ आली आहे. पणजी स्मार्ट सिटी प्रकल्प हे अति-भ्रष्टाचाराचे उत्कृष्ट प्रकरण असू शकते, असे युरी आलेमाव म्हणाले.

इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटच्या खात्यांचे ऑडिट झाले आहे की नाही हे सरकारने उघड करावे आणि ऑडिट केलेला अहवाल सार्वजनिक करावा अशी माझी मागणी आहे. या संपूर्ण प्रकल्पाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करणे आवश्यक आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

गोव्यातील शिष्टमंडळ बाहेर नेण्यापेक्षा सरकारने इतर राज्यांतील आमदार, मंत्री यांच्या शिष्टमंडळांना पणजीत आमंत्रित करावे आणि काहीही न करता जनतेचा पैसा कसा वाया जाऊ शकतो हे त्यांना दाखवावे. यामुळे एका अर्थाने गोव्याच्या पर्यटनालाही मदत होऊ शकते, अशी बोचरी टीका युरी आलेमाव यांनी केली.

मी गोव्यातील लोकांसाठी वचनबद्ध आहे आणि भविष्यातही अशा कोणत्याही उधळपट्टीचा भाग होणार नाही. माझ्या सर्व सहकारी आमदारांनी  सार्वजनिक पैशाने आयोजित केलेल्या अशा “फुकट दौऱ्यांचा” भाग होऊ नये, असे आवाहन युरी आलेमाव यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!