
‘दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातच ५० जागांचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करा’
मडगाव : मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी प्रस्तावित ५० आसनांचे वैद्यकीय महाविद्यालय मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातच सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केले आहे. यासाठी इस्पितळाचे आधुनिक पायाभूत सुविधांसह सर्व सोयींनी युक्त अशा पूर्ण क्षमतेच्या टर्शयरी आरोग्यसेवा संस्थेत रूपांतर करण्याची मागणी त्यांनी केली.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या खासगीकरणाला तीव्र विरोध दर्शविताना नायक यांनी प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाची मालकी आणि संचालन पूर्णपणे सरकारकडेच राहिले पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्यसेवा ही सरकारची जबाबदारी असून ती खासगी संस्थांकडे सोपवता कामा नये. या संस्थेने गोमंतकीयांच्या हिताला प्राधान्य देऊन पात्र विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून द्यावे, असे त्यांनी निवेदनात नमूद केले.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील दीर्घकाळ प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधताना प्रभव नायक यांनी सांगितले की, मडगांवचो आवाज गेल्या तीन वर्षांपासून या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. खाटांची कमतरता, ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध नसणे, रुग्णवाहिकांची अपुरी संख्या, वैद्यकीय कर्मचारी आणि आवश्यक उपकरणांचा तुटवडा या समस्या आरोग्यमंत्र्यांकडे वारंवार निवेदने देऊनही कायम आहेत. प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसोबतच या त्रुटी प्राधान्याने दूर करणे आवश्यक आहे.
इस्पितळातील रिकामे मजले आणि विद्यमान पायाभूत सुविधांचा उपयोग शैक्षणिक विभाग, प्रयोगशाळा आणि वैद्यकीय प्रशिक्षणासाठी करण्याचे आवाहन नायक यांनी केले. त्याचबरोबर विशेष वैद्यकीय विभाग, आधुनिक निदान उपकरणे, चोवीस तास आपत्कालीन सेवा, पुरेसा कर्मचारीवर्ग तसेच स्वच्छता, देखभाल, हाऊसकीपिंग आणि इस्पितळ प्रशासनात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालावे, असे आवाहन करत प्रभव नायक यांनी सर्वंकष व्यवहार्यता अभ्यास आणि निश्चित कालमर्यादेसह अंमलबजावणी आराखडा तयार करण्याची मागणी केली.
“प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयामुळे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे एका उत्कृष्ट, पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखालील टर्शयरी आरोग्यसेवा संस्थेत रूपांतर झाले पाहिजे. सार्वजनिक आरोग्यसेवा ही जनतेच्या हक्काची सेवा आहे. ती जनतेच्याच हातात राहिली पाहिजे आणि तिचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होता कामा नये,” असे प्रभव नायक यांनी स्पष्ट केले.




